Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दिल्लीतून आदेश;दोन महिन्याचा ‘राजकीय ब्रेक’ घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा!

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपण राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचं घोषित केलं होतं. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे या आणखीनच नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर आता दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केली होती. मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे(Pankaja Munde) या नाराज असल्याची चर्चा आहे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी पद्धतशीरपणे डावलल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. नंतर झालेल्या विधानपरिषदेमध्येही पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नव्हतं.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफरही दिली होती. तसेच काँग्रेसमधूनही पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आली होती. पण आपण कुठेही जाणार नाही, आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही त्या वेगळी भूमिका घेणार असल्याच्या अफवा सातत्याने उठत होत्या.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सामील करून घेण्याचा निर्णय पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना रुचला नसल्याची चर्चा आहे. अजित पवार गटामध्ये बीडचे आमदार आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. आता हे तीनही गट एकत्रित लढल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय भवितव्य काय अशी चर्चा या निमित्ताने होत होती.

 

हे सुद्धा वाचा…..

Pankaja Mundhe :पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

Leave a Comment