CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात 86 कोटी 49 लाखांची मदत, वाचा कोणत्या महिन्यात किती रुग्णांना मदत?

CM Medical Assistance Fund : वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Medical Assistance Fund) मदत केली जाते. यामध्ये विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. एका वर्षांत 10500 हून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्यात आली आहे. एका वर्षात 86 कोटी 49 लाखांची मदत वितरित करण्यात आली आहे.

गोरगरीब-गरजू रुग्णांना आर्थिक मदत 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता (CM Medical Assistance Fund)  कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. यामुळं अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या एका वर्षांत कक्षाकडून 10500 पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण 86 कोटी 49 लाखांची रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली आहे.

 

कोणत्या महिन्यात किती रुग्णांना किती मदत ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्येज 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 95 लाख, एप्रिल मध्ये 1984 रुग्णांना 9 कोटी 93 लाख, मे मध्ये 1329 रुग्णांना 11 कोटी 25 लाख, तर जूनमध्ये विक्रमी 942 रुग्णांना 14 कोटी 81 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय(CM Medical Assistance Fund )सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश करण्यात आल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केलं.

1 thought on “CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात 86 कोटी 49 लाखांची मदत, वाचा कोणत्या महिन्यात किती रुग्णांना मदत?”

Leave a Comment