Emergency Alert Notification: तुमच्या मोबाईलवरही सकाळी एक इमर्जन्सी अलर्ट आला का? घाबरू नका, जाणून घ्या काय आहे त्याचा अर्थ

Government Emergency Alert Notification: अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही. देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास हा इमर्जन्सी अलर्ट आला आहे.

तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करू नका. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कोणताही धोका नाही. भारत सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेली ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.

 

चाचणी नेमकी कशासाठी घेण्यात आली?

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने या अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेतली. त्याचा हा मेसेज होता.

एखाद्या विषयाची देशभरातील नागरिकांना एकाच वेळी माहिती देण्यासाठी आणि लोकांना अलर्ट करण्यासाठी ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याच यंत्रणेची चाचणी करण्यात आली आणि त्याचा मेसेज देशभराती नागरिकांना गेला आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. (Irshalwadi landslide)

 

मराठी भाषेतही आलं नोटिफिकेशन

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेल्या या चाचणी संदेशात मराठी भाषेतही अलर्ट आला होता. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळात म्हणजे १०.३१ वाजता मराठीमध्ये एक अलर्ट आला. यामुळे इंग्रजी येत नसलेल्या लोकांनाही केंद्र सरकारचा अलर्ट कळण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment