Khalapur Irshalwadi Landslide: घर नाही, फक्त मातीच! आई-बाबांना पळताही आलं नाही… दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला काटा आणणारा प्रसंग

Khalapur Irshalwadi Landslide : रायगड (Raigad News)जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. रात्रीच्या झोपेतच अनेक जणांना मृत्यूने कवेत घेतले. या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून आतापर्यंत चौघा जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. परंतु या दुर्घटनेत १२० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या एका विद्यार्थ्याने काळोख्या रात्री नेमकं काय घडलं, हे सांगितलं. त्याचे आई-वडीलही ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ही घटना सांगतानाही त्याचा थरकाप उडत होता. “आम्ही पाच-सहा मित्र दररोज रात्री शाळेत झोपायला जातो. नेहमीप्रमाणे कालही आलो. तिथे दगड आले नाहीत, पण दोन वेळा मोठ्ठा आवाज झाला आणि आम्ही बाहेर पळालो. आई-बाबा वर आहेत. आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो. आई-बाबांना पळताही आलं नाही. घर नाही राहिलं, फक्त मातीच आहे.” असं सांगतानाही त्याला हुंदका अनावर होत होता. विद्यार्थ्याचा एक भाऊ आश्रमशाळेत असतो.

 

प्राथमिक माहितीनुसार इर्शाळवाडी येथे ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

 

घटनास्थळापासून ३-४ किमी अंतरावर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही वाहनाला आत सोडलं जात नाही. गर्दी होत असल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. जवळपास ४० रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात असून त्यातील निम्म्या आत सोडल्या आहेत, तर बाकीच्या बाहेरच आहेत.

 

मुसळधार पाऊस, रात्रीचा अंधार, निसरडी जमीन यासारख्या कारणांमुळे जेसीबी, पोकलेन नेण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे केवळ मनुष्यबळाच्या आधारेच सध्या बचावकार्य सुरु आहे. अनेक अडचणींचे डोंगर फोडत, अडथळे पार करत बचावकार्य केले जात आहे.

1 thought on “Khalapur Irshalwadi Landslide: घर नाही, फक्त मातीच! आई-बाबांना पळताही आलं नाही… दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला काटा आणणारा प्रसंग”

Leave a Comment