Supriya sule:अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयाबद्दल काहीही माहीत नव्हतं : सुप्रिया सुळे

Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांना  सुप्रिया सुळे  यांनी खंडन केले आहे.

 

Supriya Sule : अजित पवारांच्या (Ajit Pawar)  निर्णयाबद्दल मला काहीही माहित नव्हतं, असा दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी रविवारचा घटनाक्रम सविस्तर पणे  सांगितला आहे. रविवारी मी बराच वेळ अजितदादांच्या निवासस्थानी होते, आमच्यात सविस्तर चर्चाही झाली. पण दादांच्या मनात काय चाललंय याबद्दल मला काही माहित नव्हतं. काही वेळानं एक-एक करून आमदार देवगिरी बंगल्यावर येऊ लागले, आणि मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनावर पोहोचले, असं सुप्रिया सुळे यांनी  सांगितलं आहे. अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांचं सुप्रिया सुळे  यांनी खंडन केले आहे.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, रविवारी मी जेव्हा देवगिरीवर गेली तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. पण मला वाटलं ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीससंदर्भात चर्चा करण्यासाठी आले आहेत . अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती.  मी देवगिरी वरून निघाल्यावर अजित पवार राज भवनाकडे गेल्याची माहिती मिळाली.

 

 

अजित पवारांच्या या निर्णयाची शरद पवारांनाही काहीच कल्पना नव्हती

अजित पवारांच्या या निर्णयामागे शरद पवार आहेत, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी या सर्व चर्चांचे खंडन केले  आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या या निर्णयाची शरद पवारांना  काहीच कल्पना नव्हती. जर पवार साहेबांना याची पुसटशीही कल्पना असती तर पवार साहेबांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती. बंड केलेल्या नेत्यांविरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई सुरू केली नसती.

 

अजित पवारांनी शरद पवारांना अंधारात ठेवून का  निर्णय घेतला? 

अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांशी  हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याने  निराश झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. वडिलांना (शरद पवार) अंधारात न ठेवता हा निर्णय अधिक सन्मानपूर्वक घेता आला असता, असेही  त्या  म्हणाल्या. अजित  पवारांच्या या निर्णयामुळे मीहि  निराश झाले आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, पण त्यांना शरद पवारांना कधीच अंधारात ठेवले नाही. शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे कारण सांगितले. शरद पवारांनी देखील त्यांना रोखले नाही. अजित पवारांच्या या निर्णयाचे  मला आश्चर्य वाटत नाही, पण मला धक्का बसला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

Leave a Comment